पुणे : पुणे विमानतळावरील प्रवासी सुविधांच्या दर्जात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ ७६ वरून ७४ व्या स्थानी आले आहे. असे असले तरी काही सुविधांमध्ये पुणे विमानतळाचा दर्जा घसरला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील असल्याने पुणे विमानतळावरील प्रवासी सुविधांमध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या वतीने सर्वेक्षण करून विमानतळ सेवा गुणवत्ता (एएसक्यू) निर्देशांक जाहीर केला जातो. जगभरातील ९५ देशांतील ४०० विमानतळांचे सर्वेक्षण यासाठी केले जाते. यात देशातील १४ विमानतळांचा समावेश आहे. यंदा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील सर्वेक्षणाच्या आधारे पुणे विमानतळ या निर्देशांकात ७४ व्या स्थानी आले आहे. पुणे विमानतळाला ५ पैकी ४.८४ गुण मिळाले आहेत. त्याआधीच्या एप्रिल ते जून तिमाहीत पुणे विमानतळ ७६ व्या स्थानी होते आणि विमानतळाला ४.८१ गुण मिळाले होते. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी सुविधांचा दर्जा सुधारल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या फळभाज्या झाल्या महाग ?

सेवा गुणवत्ता निर्देशांकात विमानतळावरील ३१ महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यात प्रवेशद्वाराजवळ बसण्यासाठी आसने, प्रवाशांना सहजपणे त्यांचा मार्ग सापडणे, विमानांच्या उड्डाणाची माहिती व्यवस्थित मिळणे, विमानतळ ते टर्मिनल अंतर कमी असणे, विमानतळ कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता, वाय-फाय सेवा गुणवत्ता, चार्जिंग स्थानकांची उपलब्धता, मनोरंजन अथवा विश्रामासाठी पर्याय, स्वच्छतागृहे, आरोग्यासंबंधी सुरक्षिततेची काळजी, स्वच्छता आणि वातावरण या इतर गोष्टींचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे स्थान जुलै ते सप्टेंबर तिमाहीत ३१ पैकी ३ सेवांमध्ये घसरले आहे. त्याआधी एप्रिल ते जून तिमाहीत पुणे विमानतळाचे स्थान १६ सेवांमध्ये घसरल्याने ते नापास ठरले होते. आता पुणे विमानतळाने पास होण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

घसरण नेमकी कुठे?

  • विमानतळावर वाहनाने सहजपणे पोहोचणे आणि वाहनतळ व्यवस्था योग्य नसणे.
  • सीमा/पारपत्र नियंत्रण तपासणीचा प्रतीक्षा कालावधी जास्त असणे.
  • इतर विमान उड्डाणांशी सहजपणे जोडणारी सेवा उपलब्ध नसणे.

आणखी वाचा-भवानी पेठेत आर्थिक व्यवहारातून व्यावसायिकाची आत्महत्या, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे विमानतळ हे देशातील पहिल्या दहा व्यग्र विमानतळांपैकी एक आहे. सहजपणे प्रवाशांना विमानतळावर पोहोचता यायला हवे. त्यामुळे मेट्रोसेवेला विमानतळाशी जोडावे लागेल. त्यातून प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांचा प्रवास सुकर होईल. याचबरोबर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या कमी असतानाही पारपत्र तपासणीला लागणारा विलंब कमी करण्याची आवश्यकता आहे. -धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

पुणे विमानतळाचे स्थान

  • जानेवारी ते मार्च – ७१
  • एप्रिल ते जून – ७६
  • जुलै ते सप्टेंबर – ७४