पुणे : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि जागतिक विमानतळ सेवा गुणवत्ता (एसक्यू) सर्वेक्षण अहवालानुसार पुणे विमानतळाचे स्थान उंचावले आहे. विमानतळाने ७४ व्या स्थानावरून ६७ व्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, विमानतळावरील असुविधांबाबत प्रवाशांच्या तक्रारी कायम असल्याने सेवासुविधांच्या बाबतीत घसरण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे विमानतळाचा नव्या टर्मिनलमुळे विस्तार झाला आहे. त्यामुळे विमान उड्डाण संख्येत वाढ झाली आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांशी, तसेच परदेशातील काही शहरांशी पुणे जोडले आहे. विमान प्रवाशांची संख्या वाढत असताना विमानतळावर सेवासुविधा पुरवणे महत्त्वाचे आहे. विमानतळ सेवा गुणवत्ता सर्वेक्षणात विमानतळावरील सेवासुविधांचे मूल्यमापन करण्यात येते. त्यानुसार गेल्या तिमाहीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा गुणवत्तेत सुधारणा झाली, तर २०२४ च्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) सेवा गुणवत्ता ४.८४ टक्क्यांवरून ४.९१ टक्के झाली. त्यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या तुलनेत सुधारणा झाली. स्वच्छता, प्रवाशांसाठीचा प्रतीक्षा कालावधी, वाहनतळ, सुरक्षितता अशा घटकांसह इतर ३१ मानांकन निकषांच्या आधारावर पुणे विमानतळाने स्थान उंचावले. मात्र, सात महत्त्वाच्या मानांकनामध्ये पुणे विमानतळाची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रवाशांचा विमानतळावर प्रवेश करताना लागणारा कालावधी, तपासणी (स्क्रीनिंग) प्रक्रियेतील मंद गती, मदत, व्यावसायिक धोरणांची अंमलबजावणी, स्वच्छतागृहे, महिला प्रवाशांसाठीच्या सुविधा यांचा समावेश आहे.

सेवा गुणवत्तेच्या मानांकनात गेल्या तिमाहीपेक्षा सुधारणा होऊन ६७वे स्थान मिळाले आहे. विस्तारीकरणाच्या दृष्टीने काही सुविधा राहिल्या असतील, मात्र जागतिक मानांकनात पुणे विमानतळाची कामगिरी सुधारत आहे. प्रवाशांच्या व्यक्तिगत अनुभवानुसार काही तक्रारी असू शकतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांत विमानतळावर अनेक सुविधा सुधारण्यात आल्या आहेत. प्रवाशांसाठीच्या सुविधांच्या गुणवत्तेत अधिक वाढ करण्याबाबत काम सुरू आहे. येत्या काळात सेवा-सुविधांमध्ये नक्कीच वाढ होईल. – संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ