पुणे : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल उद्घाटनानंतर तब्बल चार महिने कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या नव्या टर्मिनलच्या व्यवस्थेचा आणि सज्जतेचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आढावा घेतला. येत्या रविवारी हे नवे टर्मिनल कार्यान्वित होत असून, हे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे, अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी पाहणीनंतर व्यक्त केली.
पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरू करण्यासाठी मंत्री मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. या टर्मिनलवर बंदोबस्तासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त जवानांचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करून घेतल्या. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला. पाहणीसाठी मोहोळ यांच्यासमवेत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…पुणे : सारसबागेत नमाज पठण करणाऱ्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी गेल्या दहा वर्षांत पुणे शहराला मिळाला आहे. नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार असून, पुणे शहरातील हे विकासपर्व पुढेही निरंतर सुरू राहील, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.