पुणे : पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन होऊन २५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. टर्मिनलची चाचणी पूर्ण करून ते १ एप्रिलला सुरू करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. टर्मिनल ठरलेल्या वेळेत सुरू न करता पुणेकरांचा एप्रिल फूल करू नका, असेही त्यांनी बजावले होते. प्रत्यक्षात भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणेकरांचा एप्रिल फूल केल्याचे समोर आले आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्चला दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. नवीन टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर लवकरात लवकर चाचण्या पूर्ण करून ते सुरू करावे, अशी सूचना अजित पवार यांनी त्यावेळी केली होती. विमानतळ प्राधिकरणाने १ एप्रिलपासून नवीन टर्मिनल सुरू करावे. १ एप्रिलला टर्मिनल सुरू न करता पुणेकरांचा एप्रिल फूल करू नका, असेही त्यांनी बजावले होते. प्रत्यक्षात १ एप्रिल उलटून गेल्यानंतर नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी सुरू झालेले नाही. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून तांत्रिक कारणे दिली जात आहेत.
हेही वाचा…खडकी दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करा – उच्च न्यायालय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन टर्मिनलवरील चाचण्या आता संपल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव हवाई वाहतूक सुरक्षा विभागाकडे (बीसीएएस) पाठविण्यात आला आहे. बीसीएएसकडून सुरक्षाविषयक मंजुरी अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाला मिळालेली नाही. त्यामुळे चाचण्या पूर्ण होऊनही नवीन टर्मिनल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जुन्या टर्मिनलवरील गर्दी इतर गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. याचबरोबर नवीन टर्मिनल सुरू होत नसल्याने जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण लांबणीवर पडत आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. सुरक्षा विषयक मंजुरीसाठी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर ४ ते ५ दिवसांत नवीन टर्मिनल सुरू केले जाईल. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
हेही वाचा…मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
असे आहे नवीन टर्मिनल…
एकूण क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : ३ हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : ९० लाख
वाहनतळ क्षमता : १ हजार मोटारी
प्रवासी लिफ्ट : १५
हेही वाचा…पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
सरकते जिने : ८
चेक-इन काऊंटर : ३४
एकूण खर्च – ४७५ कोटी रुपये