पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर वैशाली बनकर यांच्या विशेष प्रयत्नांतून पाच नागरिकांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या रिक्षाचालकांना अजित पवार यांच्या हस्ते रिक्षाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी एका तरुणाला रिक्षाची चावी देत असताना, त्या तरुणाची तब्येत पाहून अजित पवार म्हणाले की, आरे एवढी तब्येत, बाळा तब्येत कमी कर, एवढ्या कमी वयात एवढी तब्येत योग्य नसल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर उपस्थित रिक्षाचालकांसोबत त्यांनी संवाद साधला. या दरम्यान फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला अजित पवारांनी सुनावलं.
बँकांनी किती व्याजदर आकारले आहे. त्यावर उपस्थित अधिकार्यांनी सांगितले की, बँकेमार्फत रिक्षा घेतली तर १० टक्के आणि फायनान्स कंपनीकडून घेतल्यावर १३ टक्के असल्याचे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी एका रिक्षाचालकाला तुम्हाला काय व्याज लावले. मला १३.५ टक्के व्याज लावले. हे ऐकताच आरे बापरे, कसं परवडणार असं अजित पवार म्हणाले. हे फायनान्सकडून केले. बॅंकांकडून का केले नाही. व्याज भरून भरून हे मरतात, हे तर पठाणी व्याज झालं, अशा शब्दात अजित पवारांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला सुनावले.
© The Indian Express (P) Ltd