पुणे: शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या एस.पी.कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. तर यावेळी १२ प्रकल्पांची सुरुवात देखील होणार आहे. मात्र आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मैदानांवर ठिकठिकाणी जेसीबीच्या मदतीने खडी टाकण्यात येत आहे. मात्र अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्याने, मैदानावर चिखल पाहण्यास मिळत आहे. कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा, यासाठी प्रशासनामार्फत सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे सभेच्या ठिकाणी पाहणी करण्यास आले असून अधिकारी वर्गाला आवश्यक त्या सूचना करताना दिसत आहेत.

हेही वाचा : पुण्यात सप्टेंबर महिन्याचा पाऊस फक्त दोन तासांत जाणून घ्या, पुण्यात आज किती पाऊस पडणार

एस पी कॉलेजच्या मैदानाची पाहणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे.मात्र त्यावेळी जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रवास करतील, तसेच त्या प्रवासात विद्यार्थी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिला असणार आहेत. त्यानंतर एस पी कॉलेजच्या मैदानावरील कार्यक्रम ठिकाणी येणार आहेत. तसेच आपल्या येथे आज रेड अलर्ट होता तर उद्या ऑरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. पण कदाचित उद्या रेड अलर्ट सारखा देखील पाऊस पडू शकतो. उद्या शहरातील नागरिक या कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमस्थळी येणार्‍या नागरिकांना चिखल लागू नये यासाठी सव्वा फुटाचा फ्लॅट फॉर्म तयार केला आहे. त्यावर खुर्च्या ठेवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो

दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे उद्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत सभा ठिकाणी येणार्‍या नागरिकांच्या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ajit pawar visit pm narendra modi rally venue after heavy rainfall and mud on the ground svk 88 css