लष्करी हद्दीतील रस्ता असल्याने त्यांना साडेअकरा कोटी रूपये देण्यात आले. मात्र, तरीही पुणे-आळंदी रस्त्याचे रूंदीकरण झाले नाही. गेल्या काही दिवसात या मार्गावर  सात जणांना जीव गमवावा लागला, आणखी किती बळी घेणार आहात, असा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. पालिकेच्या दहाही जलतरण तलावांवर प्रशिक्षक नसल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महेश लांडगे यांनी आळंदी रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय उपस्थित केला. त्या रस्त्याचे तातडीने रूंदीकरण होणे गरजेचे आहे, त्यासाठी तो रस्ता पालिकेकडे वर्ग व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. खासगी मराठी शाळांना कर माफ करण्यात यावा, अशी सूचना लांडगे यांनी केली. तर, सुनीता वाघेरे यांनी खासगी इंग्रजी शाळांकडे असलेली थकबाकी वसूल करण्याची मागणी केली. अविनाश टेकवडे यांनी जलतरण तलावावर प्रशिक्षक नसल्याने खेळाडूंची गैरसोय होते व त्यांना पुण्यात जावे लागते, याकडे लक्ष वेधले.