पुणे : मतदानाच्या पुर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) केला आहे. पर्वती मतदारसंघातील काही भागात भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना पैसे वाटप केल्याचा आरोप करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचे चित्रीकरण केले. भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करुन महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंगळवारी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
पर्वती मतदारसंघातील बिबवेवाडी परिसरात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केले. संबंधित भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार अश्विनी कदम उपस्थित होत्या. पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करुन घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा – पुण्यातील वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला
वडगाव शेरीत चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा देणारे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाईची मागणी बापू पठारे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीकडून पोलीस आयुक्तांना निवेदन
बिबवेवाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप, तसेच माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. वंदना चव्हाण, अरविंद शिंदे, अंकुश काकडे, संजय माेरे, बापू पठारे, अश्विनी कदम, रेखा टिंगरे यावेळी उपस्थित होते. मतदान संपेपर्यंत शहरातील सर्व मतदारसंघातील बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.