पुणे : ॲमेझॉन कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. ॲमेझॉन आणि तिच्या कंत्राटदार कंपनीने ३ महिन्यांपूर्वी केलेल्या वेतन कराराचे पालन न केल्याने कामगारांनी हा निषेध नोंदविला. हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन कामगारांना मार्गदर्शन केले.

हमाल पंचायतीच्या वतीने ॲमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतील गोदामांसमोर आंदोलन करण्यात आले. ॲमेझॉनची कंत्राटदार कंपनी वैशाली ट्रान्सकॅरिअर्सच्या माध्यमातून गोदामांमध्ये कामगार काम करतात. त्या कामगारांना चार वर्षांपासून कमी वेतन दिले जाते. तसेच, इतर सामाजिक सुरक्षा लाभही त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे हमाल पंचायतीने सरकारी यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर तीन महिन्यांपूर्वी कंपनीने कामगारांसोबत करार केला. यात राज्याचा कामगार विभागही सहभागी होता. मात्र, या कराराची अंमलबजावणी झालेली नसल्याने कामगारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले, अशी माहिती या हमाल पंचायतीचे धोरण व विधी सल्लागार चंदन कुमार यांनी दिली.

हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे म्हणाले की, वैशाली ट्रान्सकॅरियर आणि ॲमेझॉन इंडियाच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी कामगारांना मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. ॲमेझॉन कंपनीने अधिकृतपणे आमच्या मागण्यांवर अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाही.

भारतीय कायद्यांनुसार कामगारांसोबत चर्चा करून वेतन करार केले जातात. यातून उद्योग आणि कामगारांना एकत्रित चर्चा करून तोडगा काढण्यास मदत होते. अशा प्रक्रियेतून झालेल्या कराराचे पालन ॲमेझॉनकडून न होणे हे कामगारांच्या हिताच्या विरोधात आहे.

डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, हमाल पंचायत

ॲमेझॉनची भूमिका

याबाबत ॲमेझॉनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, सर्व पुरवठादार आणि त्रयस्थ संस्थांनी त्यांच्या कामगारांना कायदेशीरदृष्ट्या योग्य वेतन देणे आमच्या पुरवठा साखळी मानकांनुसार आवश्यक आहे. आमच्या भागीदार संस्थेच्या कामगारांबाबत आम्ही प्रत्यक्षपणे जबाबदार नाही. या प्रकारच्या घटनांची आम्ही गांभीर्याने दखल घेतो. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून, संबंधित सेवा पुरवठादार संस्थेशी चर्चा करून तातडीने प्रश्न सोडविण्याची पावले उचलण्यात येत आहेत.

Story img Loader