पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या टप्प्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या तुळजा भवानी मातेच्या मंदिरातील मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल आणि निर्मला पवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली.

‘तुळजा भवानी माता ही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्यासोबतच संपूर्ण राज्याचे कुलदैवत आहे. शिवसृष्टीत प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड देखील सारखाच आहे. शिवसृष्टीत येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना दर्शनासाठी हे मंदिर खुले असणार आहे.’ असे पवार यांनी या वेळी सांगितले.

प्रतापगडावरील भवानी मातेच्या मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती

तुळजा भवानी मातेची ही मूर्ती मुर्तीशास्त्राचे अभ्यासक व तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडवण्यात आली आहे. प्रतापगडावरील भवानी मातेची मूर्ती आणि शिवसृष्टीतील या मूर्तीची प्रतिकृती तंतोतंत व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. देगलूरकर यांनी मूर्ती शास्त्राच्या आधारे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मूर्तीचा अभ्यास केला. त्यानंतर शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात बसवण्यात येणाऱ्या मूर्तीला घडविण्यात आले. या मंदिरात असणारी मूर्ती प्रतापगडावरच्या भवानी मातेच्या मूर्तीची अगदी तंतोतंत घडवण्यासाठी देगलूरकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Story img Loader