आंबिल ओढा परिसरात केलेली कारवाई ही सर्व नियम पाळून केलेली असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात नागरिकांना अनेकदा वैयक्तिक आणि वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचं पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “यासंदर्भात पालिकेच्या आयुक्तांसोबतही तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या सर्व नागरिकांना हे माहित आहे की आपलं पुनर्वसन जवळचं २०० मीटरवर असलेल्या राजेंद्रनगरमध्ये होणार आहे. सर्वांना तिकडे सुसज्ज फ्लॅट्स पालिकेने दिलेले आहेत. उद्या नाल्याला पूर येऊन काही होऊ नये यासाठी सध्या हे काम करणं आवश्यक आहे”.
महानगरपालिकेकडून नाला सरळीकरणाचं काम सुरु असल्याने त्यासाठी कारवाई करण्यात आल्याचं उपायुक्तांनी सांगितलं.
आपल्याला महापालिकेची कोणतीही नोटीस मिळालेली नसून केवळ बिल्डरने आपल्याला नोटीस पाठवल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या नोटिसीची प्रतही नागरिकांनी दाखवली आहे.
हेही वाचा- पुणे-आंबिल ओढा कारवाई : हायकोर्टाचा आदेश धुडकावत कारवाई सुरु?
पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला होता. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता.
आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. तसंच ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणाव निर्माण झाला होता.