पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांची गुरुवारी पहाटे उजाडण्याआधीच झोप उडाली. हातावर पोट, त्यात निर्बंधांमुळे भेडसावत असलेली आर्थिक चणचण अशा परिस्थिती या कुटुंबांसाठी तर आज सकाळी आभाळच फाटलं. दांडेकर पुलाजवळच्या आंबिल ओढा वसाहतीतील घरांवर आज पुणे महानगर पालिकेनं बुलडोजर चालवला. अचानक या रहिवाशांवर डोक्यावरून छत जाण्याचं भयंकर संकट ओढवलं. आंबिल ओढा वसाहतीतील नागरिकांनी आपलं घरटं वाचवण्यासाठी पोलिसांशी संघर्ष केला. पण त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. शेवटी महापालिकेचा बुलडोजर त्यांच्या घरट्यांवर चालवण्यात आला. स्थानिक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगितीही दिली. पण, तोपर्यंत यातील अनेक कुटुंबांच्या डोक्यावरील छत्र जमीनदोस्त झालं होतं. आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा राहिला आहे.
साहेब दुपारपर्यंत थांबा…!
या कारवाईमध्ये अश्विनी वाळुंज या महिलेचं घर पाडण्यात आलं. त्यांच्याशी यावेळी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “आमचं कुटुंब १९८५ पासून या ठिकाणी राहत आहे. आमच्याकडे रहिवाशी पुरावे असून देखील आज सकाळपासून आमच्या वसाहतीवर कारवाई करण्यात आली. सकाळी आमच्या वसाहतीमध्ये पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी आले. घर खाली करण्यास सांगितले. आम्ही त्यांना म्हटलं साहेब दुपार पर्यंत थांबा, पण ते काही ऐकण्याचे मनस्थितीमध्ये नव्हते आणि त्यांनी सरळ घर पाडण्यास सुरुवात केली”!
पुणे-आंबिल ओढाः वेळोवेळी नोटिसा देऊन आम्हीच केली कारवाई – पुणे महापालिकेनं केलं स्पष्ट
आधीच करोनानं मारलं, त्यात…
अश्विनी वाळुंज पुढे म्हणाल्या, “आम्ही एक एक रुपया जमवून घर उभं केलं होतं. पण डोळ्यांसमोर घर पाडताना पाहून पुढे सर्व अंधार दिसू लागला आहे. आधीच करोना आजाराने मारलं. त्यात सकाळी घर पाडलं. आमच्यासह अनेकांची घरं पाडण्याचा सपाट त्यांनी चालूच ठेवला. आख्खा संसार रस्त्यावर आणून ठेवला. त्याचदरम्यान आमच्या वसाहतींमधील कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता मी, माझं बाळ आणि कुटुंबाला कुठं घेऊन जाऊ? पावसाचे दिवस आहेत”.
आंबिल ओढा कारवाई : तो प्लॉट कुणालाही देता येऊ शकत नाही; बिल्डरने केला खुलासा
दरम्यान, न्यायालयाने स्थगिती आणल्यानंतर आता आंबिल ओढा परिसरातील स्थानिक पालिकेकडे घर उभारून देण्याची मागणी करत आहेत.