गॅस रेग्युलेटर खराब झाल्याने संकेतस्थळावरुन गॅस वितरण कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधणाऱ्या ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्याने पावणे सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संकेतस्थळावर असलेल्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातील मोबाइल क्रमांक चोरट्याने बदलल्याचे उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला भांडारकर रस्त्यावर राहायला आहेत. तक्रारदार महिलेच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर संपलेला होता. त्यांनी नवीन सिलेंडर मागविला. मात्र, रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे गॅस कंपनीचा क्रमांक संकेतस्थळावरुन शोधला. चोरट्यांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्रातील मोबाइल क्रमांक बदलून स्वत:चा क्रमांक टाकला होता.

महिलेने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविली. नवीन रेग्युलेटरबाबत विचारणा केली. तेव्हा चोरट्याने त्यांना क्विक हेल्प ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ज्येष्ठ महिलेची माहिती चोरट्याने घेतली. बँक खात्याची माहिती घेऊन त्यांना ऑनलाइन पद्धतीने २५ रुपये पाठविण्यास सांगितले. पैसे पाठविल्यानंतर कंपनीतील तंत्रज्ञ रेग्युलेटर बदलून देतील, अशी बतावणी चोरट्याने केली. महिलेने ऑनलाइन पद्धतीने २५ रुपये पाठविल्यानंतर चोरट्याने महिलेच्या बंँक खात्यातून पाच लाख ७३ हजार ८०७ रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने तक्रार नोंदविली. डेक्कन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune an elderly woman who tried to solve her gas cylinder problem online was cheated of rs 6 lakh online pune print news rbk25 msr