पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. कला आणि व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी कमी असून, १८ ते २१ जून या कालावधीत संस्थाअंतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत प्रवेश घेता येणार आहे.

शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी या संदर्भातील माहिती दिली. यंदा ३४३ महाविद्यालयांतील एक लाख १९ हजार २९० जागांसाठी अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरून पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण ७० हजार ३६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार कला शाखेला ५ हजार ५२५, वाणिज्य शाखेला २४ हजार ६५८, विज्ञान शाखेला ३९ हजार ४९२, व्यवसाय अभ्यासक्रमाला ६९२ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. तात्पुरत्या यादीमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, गुण यात काही दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या हरकती संकेतस्थळावरील विद्यार्थी लॉगइनद्वारे नोंदवणे आवश्यक आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयालयाकडून हरकतींचे ऑनलाइन निराकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा…रेल्वेत प्रवाशाला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा… मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना

महाविद्यालयातील संस्थाअंतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १८ ते २१ जून या कालावधीत कोट्याअंतर्गत अकरावीचा प्रवेश निश्चित करता येणार आहेत. कोट्याअंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.