लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे आता मेट्रोने जोडली जाणार आहेत. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून, त्यानंतर लवकरच या मार्गावर या सेवा सुरू होणार आहेत. यासाठी मे महिन्याच्या मध्यातील मुहूर्त निघण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गरवारे महाविद्यालय हा मेट्रो मार्गही त्याचवेळी सुरू होईल, अशी माहिती मेट्रोतील सूत्रांनी दिली.

गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गाची कामे महामेट्रोकडून वेगाने सुरू आहेत. दोन्ही मार्गावरील स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. एप्रिल अखेरीस या दोन्ही मार्गांवर सर्व कामे पूर्ण होतील. याचबरोबर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी होऊन मंजुरीही मिळू शकते. एप्रिल अखेरपर्यंत ही मंजुरी मिळाल्यानंतर महामेट्रोकडून या मेट्रो मार्गांवरील सेवेच्या उद्घाटनाबाबत राज्य सरकारच्या नगर विकास विभागाला पत्र पाठवले जाईल. नगर विकास विभागाकडून या उद्घाटनाची तारीख ठरवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किलोमीटर) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किलोमीटर) असे ३३ किमी लांबीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या ७ किलोमीटर मार्गावर आणि वनाज स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या ५ किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा गेल्या वर्षी ६ मार्चला सुरू करण्यात आली. आता वर्षभरानंतर विस्तारित प्रवासी सेवा मेट्रो सुरू करीत आहे.

मेट्रोचे नवीन सुरू होणारे मार्ग

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक
अंतर – ५.१२ किलोमीटर
स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल
फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय

अंतर – ८ किलोमीटर

स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल या दोन्ही मार्गांवरील कामे एप्रिलअखेरीस पूर्ण करण्याचे मेट्रोचे नियोजन आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करून अंतिम मंजुरी देतील. यानंतर राज्य सरकारच्या या मार्गांवरील सेवा सुरू करण्याचा निर्णय घेईल. -हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune and pimpri chinchwad cities will now be connected by metro pune print news stj 05 mrj pune print news stj 05 mrj