पिंपरी : भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील (वायसीएम) शिकाऊ डॉक्टरकडून तपासणी करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र शासनाच्या नियमावलीचे पालन करून सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याबाबतचा ‘वायसीएम’च्या अधिष्ठात्यांचा अहवाल महापालिका आयुक्तांनी फेटाळला असून, पुन्हा चौकशी करून सुधारित अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेडकर यांना सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र ‘वायसीएम’मधून देण्यात आले आहे. या रुग्णालयातील अस्थिरोग आणि फिजिओथेरपी विभागाच्या डॉक्टरांनी केंद्र शासनाच्या नियमावलीचे पालन करून प्रमाणपत्र दिल्याबाबतचा अहवाल ‘वायसीएम’च्या अधिष्ठात्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे दिला आहे. मात्र, तो आयुक्तांनी फेटाळला आहे. शिकाऊ डॉक्टरांकडून तपासणी करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत पुन्हा चौकशी करून सुधारित अहवाल सादर करण्याचा आदेश सिंह यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची चाळण, शहरात किती खड्डे?महापालिकेचा काय आहे दावा?

खेडकर कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव?

खेडकर कुटुंबीयांशी संबंधित असलेली तळवडे येथील थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थकबाकीमुळे जप्त केली आहे. दोन लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी भरण्यास ११ दिवसांचा कालावधी असून, कर न भरल्यास कंपनीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

पूजा खेडकर या वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणांमुळे अडचणीत आल्या आहेत. खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून तळवडेतील कंपनीचा पत्ता दिला होता. प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिले होते. या रेशन कार्डवरही याच कंपनीचा पत्ता आहे. तळवडे गावठाणातील जोतिबानगर येथे असलेली थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पूजा यांच्या आई मनोरमा यांच्या नावावर आहे. कंपनीमार्फत २००९ पासून एप्रिल २०२२ पर्यंत नियमित व्यावसायिक कर भरण्यात आला. त्यानंतर कराचा भरणा केला नाही. कंपनीकडे दोन लाख ७७ हजारांचा कर थकीत आहे. त्यामुळे महापालिकेने मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस दिली होती. नोटिशीनंतरही कर न भरल्याने अधिपत्र बजाविण्यात आले असून, १९ जुलै रोजी मालमत्ता जप्त केली आहे. अधिपत्र बजाविल्यानंतर २१ दिवसांच्या आत कर भरावा लागतो. या वेळेत कर न भरल्यास मालमत्तेचा लिलाव किंवा विक्री केली जाते. थकीत कर भरण्यासाठी केवळ ११ दिवसांचा कालावधी असून, या कालावधीत कर न भरल्यास खेडकर कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मार्च २०२४ मध्ये जप्तीपूर्व नोटीस दिली होती. जप्ती अधीपत्र बजावत मालमत्ता जप्त केली आहे. कर भरण्यासाठी २१ दिवसांचा वेळ दिला आहे. या मुदतीत कर न भरल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल.

नीलेश देशमुख (सहायक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका)
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune apprentice doctor issued disability certificate to ias puja khedkar commissioner s order of inquiry pune print news ggy 03 css
Show comments