पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा कारणास्तव अडथळा ठरत असलेल्या राजभवनाच्या आवश्यक जागेबाबत अखेर राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या कामाला आणखी वेग येणार असून, आनंदऋषीजी चौकाजवळील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) विद्यापीठाच्या जागेपासून प्रवाशांसाठी उन्नत पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) करण्यात येणार आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मार्गिकेदरम्यान, पुण्यातील राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान ‘राजभवन’ परिसर येत असल्याने या उन्नत प्रकल्पाला सुरक्षेच्या कारणास्तव अडसर निर्माण झाला होता. राजभवनाच्या जागेसमोरून या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० टक्के भूसंपादन करून देण्याची जबाबदारी सरकार म्हणजेच पर्यायाने जिल्हाधिकारी आणि ‘पीएमआरडीए’ने घेतली आहे. त्यानुसार सुरक्षिततेच्या कारणास्वत आवश्यक परवानग्या घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध बैठका पार पडल्या असून परवानग्या घेण्यात आल्या आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची मान्यता
मेट्रो मार्गिका प्रकल्पासाठी एक लाख ८६ हजार ५५९ चौरस फूट जागा लागणार असून, राजभवन वगळता सर्व जागा पीएमआरडीने ताब्यात घेऊन काम सुरू केले होते. मात्र, राजभवनाच्या ८०५५ चौरस मीटर जागेचा प्रश्नाबाबत निर्णय प्रलंबित राहिला होता. पीएमआरडीएकडून राज्य सरकारकडे राजभवनच्या जागेबद्दल मागणी करण्यात आली होती. तसेच सुरक्षिततेबाबत आराखडा सादर करण्यात आला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा देण्यास मान्यता दिली आहे.
‘राजभवन’च्या जागेसमोरून जाणाऱ्या मेट्रोच्या अनुषंगाने सुरक्षिततेसाठी पीएमआरडीएने खबरदारी घेऊन मार्गिका मार्ग प्रस्तावित केला आहे. राजभवनासमोरील विद्यापीठाच्या बाजूने प्रवाशांसाठी सुविधा करण्यात आली आहे. त्यासाठी उन्नत पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) करण्यात येणार आहे. – रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए