पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी कुणी न्यायचे, यावरून रिक्षाचालकांमध्ये होणारी वादावादी आणि अडवणूक यांमुळे प्रवाशांच्या त्रासात मात्र भर पडत आहे. याबाबत रेल्वे प्रशासन, शहर वाहतूक पोलीस आणि पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तक्रारी करण्यात आल्या असून, ठोस कार्यवाहीची प्रवाशांची मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे रेल्वे स्थानकातून प्रवासी बाहेर आल्यानंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांच्या भोवती घातला जाणारा गराडा, प्रवासी पुढे जात असला, तरी त्याचा अक्षरश: पाठलाग करून रिक्षात बसण्यासाठी लावला जाणारा तगादा, यामुळे प्रवासी हैराण होत आहेत. त्यातच प्रवासी प्रीपेड रिक्षा केंद्रावर गेलाच, तर तेथे इतर रिक्षाचालकांकडून प्रवाशाला अडवणूक होते, असे चित्र आहे. त्यामुळे नक्की कोणता पर्याय निवडायचा, अशा संभ्रमात प्रवासी पडत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा…दुचाकी वितरकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक, कोणत्या कारणामुळे पुणे ‘आरटीओ’ने घेतला निर्णय ?

रेल्वे स्थानकात प्रीपेड रिक्षाचालक संघटना आणि मीटरवरील रिक्षाचालक यांच्यामध्ये मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत. नजीकच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात याबाबत १३ ते १४ गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यंतरी दोन परदेशी तरुणांना मीटरवरील रिक्षाचालकाने अतिरिक्त शुल्क आकारून दूर नेऊन लुटल्याचीही घटना घडली. मीटरवरील रिक्षाचालक प्रवाशांना इच्छितस्थळी सोडल्यानंतर मीटरवरील शुल्कापेक्षा जास्त शुल्काची मागणी करत असल्याच्या तक्रारीदेखील आरटीओ कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

‘पुणे रेल्वे स्थानकात वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन आणि आरटीओ यांच्या समितीने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार १७ रुपये प्रति किलोमीटर दराप्रमाणे प्रवाशांकडून प्रवासी शुल्क आकारण्यात येत आहे. त्यासाठी विशेष रांग आणि प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षितता पुरवण्यात आली आहे. प्रवाशांकडूनही प्रीपेड रिक्षाचा पर्याय निवडला जात आहे. या सुविधेला दिवसेंदिवस प्रवाशांकडून मागणी वाढत असल्याने मीटरवरील रिक्षाचालकांकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत,’ असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाचे केशव क्षीरसागर यांनी केला.

‘रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आलेल्या प्रीपेड केंद्र सुविधा प्रवाशांच्या आणि रिक्षाचालकांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मात्र, गिग कामगार संघटना मीटरवरील रिक्षाचालकांवर दादागिरी करते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रीपेड रिक्षा केंद्राची जबाबदारी काढून घेण्यात यावी, असे निवेदन स्थानिक पोलीस प्रशासन, आरटीओ, वाहतूक पोलिसांकडे देण्यात आले आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे यांनी दिली.

हेही वाचा…नोकरदारांनो रिक्षा परवाने जमा करा! काय आहे ‘आरटीओ’;चा नियम ?

आम्ही फक्त सुरक्षित आणि परवडणाऱ्या रिक्षा सेवेच्या शोधात असतो. तो पर्याय प्रीपेड रिक्षा केंद्रावरून मिळत असल्यास त्याला प्राधान्य असेल. मात्र, रेल्वे स्थानकाबाहेर नेहमीच रिक्षाचालकांचा गराडा आणि वादावादीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. संगीता शर्मा, प्रवासी

प्रीपेड रिक्षाचालकांना होणाऱ्या त्रासाबाबत संबंधित संघटनेकडून निवेदन प्राप्त झाले आहे. लवकरच संबंधित रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून कार्यवाही करण्यात येईल. प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत शहर वाहतूक पोलिसांकडे पत्र पाठविण्यात आले आहे. स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune arguments among rickshaw pullers over passengers at pune railway station are troubling passengers pune print news vvp 08 sud 02