करोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षातून निर्बंध मुक्त गणेशोत्सव आपण सर्वजण साजरा करीत आहोत. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळ आणि घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता साहित्य खरेदी देखील सुरू झाली असून, आपल्या प्रत्येकाच्या घरी लाडक्या गणरायाची मूर्ती कशी असावी, हा प्रत्येक जण विचार करीत असतो. हेच ओळखून पुण्यातील येरवडा कारागृहामार्फत यंदा प्रथमच २५० शाडू मातीच्या मूर्ती कैद्यांकडून तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा अशा सुंदर आणि सुबक अशा मूर्ती विक्रीस देखील ठेवल्या आहेत. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आणि सर्वांना दर परवडणारे असल्याने, नागरिक अधिकाधिक खरेदीस पसंती देत आहेत.

पुणेकर नागरिक चांगलाच प्रतिसाद देत आहेत –

या उपक्रमाबाबत येरवडा कारागृहाच्या राणी भोसले म्हणल्या की, “येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मार्फत विविध वस्तू तयार केले जातात. त्या वस्तूची विक्री वर्षभर आपल्या येथील विक्री केंद्रावर सुरू असते. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. पण त्याहीपेक्षा कैद्यांना त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्याची, यातून एक संधी मिळत असते. शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर नव्याने आयुष्याची सुरुवात करताना आपल्या हातात काही तरी कला असावी, हाच या सर्व उपक्रमा मागील उद्देश आहे. तसेच रक्षाबंधन आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने विक्री केंद्रावर, त्या सणाच्या अनुषंगाने वस्तू विक्री करीता असतात. त्याला पुणेकर नागरिक चांगलाच प्रतिसाद देत आहेत.”

मुर्तींची किंमत ६०० रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत –

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “नाशिक मध्यवर्ती कारागृहामधील कैद्यांमार्फत गणपती मूर्ती तयार केल्या जात होत्या. तेथील प्रशासनासोबत संवाद साधून आम्ही तेथील दोन मूर्तिकार आपल्या येथे प्रशिक्षण देण्याकरिता मे महिन्यात बोलाविले. या मूर्ती तयार करण्यास जवळपास १५ कैदी सहभागी झाले असून अडीच ते साडेतीन फुट उंचीच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लाल बागचा राजा अशा विविध मूर्ती तयार केल्या आहेत. या मुर्तींची किंमत ६०० रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. तर आतापर्यंत जवळपास ५० मुर्तींचे बुकिंग झाले आहे.”

Story img Loader