पुणे : वादातून शेतकऱ्यावर सराइत आणि साथीदारांनी कोयत्याने वार केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी सराइतासह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विजय श्रीरंग काळभोर (वय ४६, रा. रायवाडी, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यासह पाच ते सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – पुणे : दहशत माजविणार्या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
हेही वाचा – पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायाळ याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. काळभोर आणि घायाळ यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. २३ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास काळभोर यांचा भाऊ दीपक शेतात काम करत होते. त्यावेळी आरोपी घायाळ साथीदारांसह तेथे आला. त्यांच्याकडे काेयते आणि गज होते. आरोपींनी दीपक यांना शिवीगाळ करुन धमकाविण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपक यांनी भाऊ विजय यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. विजय तेथे दुचाकीवरुन शेतात आले. घायाळने विजय यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. घायाळबरोबर असलेल्या साथीदाराने त्यांना गजाने मारहाण केली. आरोपींनी काळभोर यांच्या शेतातील मजुरांना शिवीगाळ केली. दगडफेक करुन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.