जगाच्या नकाशावर केवळ शिक्षणासाठीच पुण्याचा ठसा नाही, तर त्याच्या पलीकडेही महत्त्वाचे शहर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.. पुरावाच हवा असेल तर ऐका, गेल्या माहिना-दीड महिन्यांच्या काळात ब्रिटनचा युवराज चार्ल्स, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई यांनी आवर्जून पुण्याला भेट दिली. ते केवळ हवापालट म्हणून पुण्यात आले नव्हते, तर काही भेटी आर्थिक होत्या, तर काही इतर क्षेत्राशी संबंधित! याशिवाय विविध देशांची शिष्टमंडळे, उच्च स्तरावरील अधिकारी, मंत्री यांचीही पावले पुण्याकडे वळल्याचे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळाले आहे.
आताच्या वर्षांत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्याला भेटी देणारे परदेशी अधिकारी, मंत्री व उद्याोगपती यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यात जपान, स्वीडन, इस्रायल, जर्मनी यांसारख्या देशांतील शिष्टमंडळाबरोबरच युवराज चार्ल्स आणि हमीद करझाई यांच्या नेतृत्त्वाखाली अनुक्रमे ब्रिटन व अफगाणिस्थान या देशांच्या शिष्टमंडळांचा समावेश होता.
पुण्यातील शिक्षणसंस्था, उद्योग हे परदेशी शिष्टमंडळे, राजदूत यांना आकर्षित करताना दिसत आहेत. आतापर्यंत दिल्ली, मुंबई या शहरांमध्येच परदेशी शिष्टमंडळाच्या भेटी होत होत्या. त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई या ठिकाणांना प्राधान्य मिळू लागले. मात्र, आता या भेटींमध्ये पुणे दौऱ्याचाही आवर्जून समावेश होताना दिसत आहे. पुण्यामध्ये विविध शैक्षणिक करार, वाहनउद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र यांना या शिष्टमंडळांनी प्राधान्याने भेटी दिल्याचे दिसत आहे. जपानच्या शिष्टमंडळाने पुण्यामध्ये उद्योग समूहांना भेट दिली होती. स्वीडनच्या शिष्टमंडळाने आरोग्य क्षेत्रासंबंधी रस दाखवला, इस्त्राईल-जर्मनी यांनी शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला भेटी दिल्या आहेत. ब्रिटिश युवराजांनी पुण्याला पहिल्यांदाच भेट दिली. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्षही पहिल्यांदाच पुण्यात आले होते. याशिवाय पुण्यातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित संस्था, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यांनाही अनेक देशांच्या संरक्षण विभागाच्या शिष्टमंडळांनी भेटी दिल्या आहेत. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, थायलंडचे धर्मगुरू यांचीही पावले पुण्याकडे वळली आहेत.
पुण्यामध्ये परदेशातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जगाच्या नकाशावर पुण्याचे नाव मोठे करण्यात मोठा वाटा आहे. पुणे विद्यापीठ आणि पुण्यातील अनेक शिक्षणसंस्थांची परदेशी विद्यापीठांबरोबर गेली अनेक वर्षे करार, शैक्षणिक देवाण-घेवाण सुरू आहे. देशात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश विद्यार्थी पुण्यात शिकत आहेत. त्याचबरोबर पुण्यामध्ये वाढणारे उद्योग, सेवा क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्रामध्ये होणारी पुण्याची वाढ या पाश्र्वभूमीवर देशांना पुण्यामध्ये रस वाटू लागला आहे.
पुण्याकडे ओढा का?
‘‘अनेक क्षेत्रांमध्ये पुणे आघाडीवर आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पुण्याने लक्ष वेधून घेतले आहे. शिक्षण, आरोग्य, सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी शिष्टमंडळे, उद्योग यांना अधिक रस असल्याचे दिसते आहे. त्यातच पुणे हे तुलनेने शांत शहर आहे. त्याची दखलही जागतिक पातळीवर घेतली जाते. त्यामुळे पुण्यामध्ये परदेशी शिष्टमंडळांच्या भेटी वाढल्या आहेत. विकसित देशांना पुण्यामध्ये मोठी बाजारपेठ दिसत आहे, तर विकसनशील देशांना पुण्यातील शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगती खुणावत आहे.’’
– सुधीर देवरे, माजी भारतीय राजदूत
युवराज चार्ल्स, हमीद करझई अन् परदेशी शिष्टमंडळे पुण्यात कशासाठी? –
आताच्या वर्षांत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्याला भेटी देणारे परदेशी अधिकारी, मंत्री व उद्याोगपती यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-12-2013 at 02:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune attracting foreign depulations