शिकवणीवरुन रिक्षाने घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. विनयभंग करणारा रिक्षाचालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत एका सतरा वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी खासगी शिकवणीला जाते. शिकवणी वर्गातून ती रिक्षाने घरी जात होती. कोंढव्यातील टिळेकरनगर तसेच इस्कॉन मंदिर परिसरातील रस्त्यावर अंधारात रिक्षा चालकाने रिक्षा थांबविली. रिक्षा चालकाने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीने त्याला विरोध केला. रिक्षाचालकाने मुलीच्या गळ्याचा चावा घेतला आणि रिक्षाचालक पसार झाला.
मुलीने आरडाओरडा केला. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत असून पोलिसांनी तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.