सध्या पुण्यातील एक केळीवाला चांगलाच चर्चेत आला आहे. तो हटके स्टाईलने ग्राहकांना केळी घेण्यास सांगतो, त्याला ग्राहकांनी देखील चांगलीच पसंती दिली आहे. नामदेव दत्ता माने असं या अवलीयाचं नाव आहे. पहिल्या करोना लाटेत लॉकडाऊन झालं अन नामदेव माने यांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कुटुंबाचा भार त्यांच्यावर असल्यानं करायचं काय? असं असताना त्यांनी फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नामदेव यांची केळीवाला म्हणून सध्या ओळख आहे. त्यांची डान्सिंग स्टाईलने हटके केळी विक्रीची पद्धत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
नामदेव दत्ता माने हे मूळ लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचं शिक्षण दहावी झालं असून ३ वर्षांपूर्वी ते एका कंपनीत काम करत होते. त्यांना महिन्याकाठी १५ हजार रुपये मिळायचे असं नामदेव यांनी सांगितलं. परंतु, करोनाची पहिली लाट आली आणि लॉकडाऊन झालं. यात त्यांची नोकरी गेली. ते हताश झाले नाहीत आणि नाराज देखील. त्यांनी याच आव्हानाला पेलत फळ विक्रीचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. अगोदर जेमतेम केळी घेऊन ते विकायचे. परंतु, दिवसभरात अगदी थोडी कमाई होत असत.
“महागाईच्या काळात स्वताईंची कमाल, केळी २० रु डझन… केळी ३० डझन”
यानंतर केळी विक्रेते नामदेव माने यांनी दिघी परिसरातील आळंदी- पुणे रस्त्यावर केळी विकण्यास सुरू केले. अगोदर ग्राहकांच लक्ष वेधून घ्यायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यानंतर, त्यांनी न लाजता डोक्यावर एक केळीची फनी, गळ्यात दराची पाटी आणि हातात एक केळीची फनी, तोंडाला गुंडाळलेला गंमजा… आणि नाचत, महागाईच्या काळात स्वताईंची कमाल, केळी २० रु डझन… केळी ३० डझन असे म्हणून त्यांनी ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : “अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली”
अनोख्या पद्धतीने केळी विक्री केल्यानंतर त्यांचे ग्राहक वाढले असून दिवसाची कमाई देखील वाढली आहे, असं नामदेव माने यांनी सांगितलं. नामदेव यांनी लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या व्यक्तींना आवाहन केलं आहे. तुम्ही हताश होऊ नका, काही तरी व्यवसाय करा. भाजी, फळ विक्री करा. नोकरी गेली म्हणून त्यावर विचार करू नका. स्वतःचा व्यवसाय सुरू करा असं नामदेव यांनी म्हटलं आहे.