पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महाल या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. डेक्कन जिमखाना, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग मार्गे लाल महाल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा >>> पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत भाजपच्या नेत्याकडून अनेक वेळा अपमान करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांबाबत विधान केले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भाजप नेतृत्वाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ही गंभीर बाब असल्याचे सांगत विविध संघटनांनी मंगळवारी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.