झाडे लावा, झाडे जगवा.. पाणी वाचवा.. सायकल चालवा.. प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा.. असा संदेश देत सदाशिव पेठेतील अशोक देशमुख या ५५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चक्क पुणे-बंगळुरू हा प्रवास सायकलवरून करीत पर्यावरणविषयक जनजागृती केली. देशमुख यांनी केवळ आठ दिवसांत हा प्रवास पूर्ण करीत ठिकठिकाणी प्रबोधन केले.
खडकी येथील दारूगोळा कारखाना (अॅम्युनिशन फॅक्टरी) येथे कामास असलेले अशोक देशमुख आजही नोकरीला सायकलवरूनच जातात. पर्यावरणरक्षणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी यापूर्वी पुणे-हैदराबाद-पुणे असा प्रवास केला होता. आता पुणे-बंगळुरू-पुणे हा १८०० किलोमीटरचा प्रवास दररोज किमान २०० किलोमीटर याप्रमाणे सायकलिंग करून केवळ आठ दिवसांतच पूर्ण केला आहे. देशमुख यांच्या या कामगिरीबद्दल छत्रपती राजाराम मंडळाने त्यांचा सत्कार केला. मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी श्रीगणेशाची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. अरुण गवळे, संग्राम शिंदे, स्वप्निल खडके, बाळासाहेब थरकुडे, मेघराज िनबाळकर या वेळी उपस्थित होते.
दररोज सायकल चालविल्यामुळे आरोग्य चांगले राहते. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबरीने सायकल या स्वयंचलित वाहनाचा वापर केल्यामुळे प्रदूषणदेखील होत नाही, असे देशमुख यांनी सांगितले.