बाणेर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला तीन दिवस उलटले तरी या गुन्ह्य़ात चतु:शृंगी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. वकिलांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची दोन मुले व भाच्यासह चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
अॅड. आशिष अर्जुन ताम्हाणे (वय २६, रा. शिवसागर हॉटेलमागे, बाणेर) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समीर बाबुराव चांदेरे, किरण बाबुराव चांदेरे, गणेश इंगवले, मनोज इंगवले व त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास अॅड. ताम्हाणे हे मोटारसायकलवरून बाणेर रस्त्याने घरी चालले असताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांना धडक देऊन पाडले. त्यानंतर मोटारीतून आलेल्या चौघांनी मिळून त्यांना मारहाण केली होती.
दरम्यान याप्रकरणी आरोपींना लवरात लवकर अटक करण्याची मागणी पुणे बार असोसिशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ३०) जिल्ह्य़ातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी होऊ नये, असे अवाहन पुणे बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.