बारामती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या ‘एक तारीख एक तास’ या स्वच्छता अभियानात बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी रविवारी सक्रीय सहभाग घेतला. आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय प्रत्येक नागरिकाने अंगी बाणवावी, असे आवाहन करताना अजित पवार यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत शाळा, महात्मा गांधी हाउसिंग सोसायटी, आमराई येथे स्वच्छता पंधरवडा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सुरूवात अजित पवार यांच्या हस्ते झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे संचालक सचिन सातव या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : शरद पवार यांचे सूचक विधान, म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण…’
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा सुरू करा, आमदार महेश लांडगे यांची मागणी
अजित पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या श्रमदानाच्या कार्यक्रमाचे आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपली वसुंधरा नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने कार्य करावे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील कचरा कचराकुंडीतच टाकावा, स्वच्छतेच्या प्रती सर्वांनी सवय लावून घेणे गरजेचे आहे. सफाई कर्मचारी त्यांचे काम व्यवस्थित करतातच. पण, नागरिकांनीही त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावीत. बारामती शहरात आज विविध ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत असून श्रमदान करून आपण सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करूया.