पुणे : ढोल-ताशांचा गजर, बँडपथकांच्या सुरावटी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गणेशभक्तांची गर्दी या सर्व गोष्टी टाळून मिरवणुकीविना साधेपणाने गणरायाला मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. करोना संकटाचे गांभीर्य ओळखून घरगुती गणपतींचे घरामध्येच आणि सार्वजनिक मंडळांचे मंदिरामध्ये किंवा उत्सव मंडपामध्ये उभारलेल्या हौदात विसर्जन करण्यात आले. अवघ्या तीन तासांमध्ये मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्याचा नवा इतिहास या निमित्ताने नोंदवला गेला.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा सोहळा हे सर्व गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्र असते.  विसर्जन मिरवणुकीच्या प्रत्येक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघडय़ा, मानाच्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली पथके, कार्यकर्त्यांचा उत्साह, पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद अशा वातावरणात गणरायाला निरोप देण्याच्या परंपरेला यंदा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंधने आली. गणेशोत्सवासह विसर्जन सोहळा साधेपणाने साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गणेश मंडळांनी विसर्जन सोहळ्याला साधेपणातून एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. फुलांनी सजविलेल्या स्वच्छ पाण्याच्या कुंडामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. घरगुती मूर्तीचे भाविकांनी घरीच विसर्जन केले. ज्यांना घरी करणे शक्य झाले नाही, त्यांनी महापालिकेने व्यवस्था केलेल्या फिरत्या हौदामध्ये विसर्जन केले. तर, काहींनी मूर्ती दान केली.