शहरातील नागरिक आणि कलाकार यांच्यात समन्वय साधून शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मदत करणारा बिनाले महोत्सव यंदाही पुण्यात होणार असून या महोत्सवातील पहिला कार्यक्रम शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) होत आहे. ‘वारसा तुमचा आणि माझा, आमचा’ ही पुणे बिनालेची संकल्पना आहे.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे शहरातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी बिनाले महोत्सव उपयुक्त असून या महोत्सवात शनिवारवाडा, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी उद्यान, घोले रस्ता येथील कला दालन येथे विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. पुणे बिनाले महोत्सव ६ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होईल. भारती विद्यापीठ आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त आयोजनातून हा महोत्सव साजरा होईल. बिनाले ही जगाने स्वीकारलेली संकल्पना आहे. या महोत्सवात अनेक कलाकार एकत्र येऊन त्यांच्या कला शहरातील सार्वजनिक ठिकाणी सादर करतात. दर दोन वर्षांनी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
सार्वजनिक ठिकाणी चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रे आदी कलाप्रकार पुण्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी सादर केले जाणार असल्यामुळे त्याबद्दलची जागरूकता या महोत्सवाने निर्माण होईल. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी होत असलेल्या कार्यक्रमाने पुणे बिनाले महोत्सवाची सुरुवात होणार आहे. कलाकार व कलाकारांचे गट या वेळी त्यांची कला सादर करतील. बिनाले महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (२२ नोव्हेंबर) बोस कृष्णम्माचारी यांच्या हस्ते होईल. त्यांनी भारतातील पहिला बिनाले महोत्सव आयोजित केला होता.

Story img Loader