पुणे : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली असली, तरी ही निवडणूक खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या, की मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. या दोघांपैकी एकाकडे शहर भाजपचे नेतृत्व जाणार असल्याची चर्चा असून, भाजपमधील नेतृत्वासाठीची स्पर्धाही वाढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका बसला. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप बहुमताच्या जवळ गेला. पुण्यातील कसब्यासह कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीनंतर शहर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वासही उंचावला असून, महापालिका निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, की महायुती म्हणून लढणार, याबाबत संदिग्धता आहे. मात्र, तयारी सुरू केल्यानंतर कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढविली जाणार, याची उत्कंठा आहे.

हेही वाचा…भीमथडी जत्रेत चोरी करणारे गजाआड

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. भाजपचे शंभर नगरसेवक विजयी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यातच महापालिकेतील सत्ता राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असल्यास संबंधित पक्षाचा खासदार पक्षाबरोबर शहराचेही नेतृत्व करतो, हे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी काही काळापूर्वी पुण्याचे एकहाती नेतृत्व केले होते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याकडे शहराचे नेतृत्व होते. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील विजयी झाल्यानंतर शहर नेतृत्वासाठी बापट आणि पाटील यांच्यातील शीतयुद्धही चर्चेचा विषय ठरला होता. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या काळात पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाल्यानंतर मात्र पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद गेले आणि पाटील यांचा प्रभाव कमी झाला.

दरम्यानच्या काळात पुण्याची खासदारपदाची निवडणूक मुरलीधर मोहोळ यांनी लढवून जिंकली. त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपदही मिळाले. शिवाय, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारीही देण्यात आली. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे मानले जातात. त्यामुळे शहराचे नेतृत्व करण्यासाठीचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दुसरीकडे, चांगल्या मताधिक्क्याने कोथरूडमधून विजयी झालेले चंद्रकांत पाटील अलीकडे शहरातील बऱ्याच उपक्रमांत लक्ष घालून शहराचे नेतृत्व करण्यास उत्सुक असल्याचा संदेशच त्यांनी एक प्रकारे दिल्याचे मानले जाते.

हेही वाचा…पुणे : मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचेच अपघात का होत आहेत ? गंभीर समस्येवर कोणत्या उपाययोजना होणार?

फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची

महापालिकेत भाजपची सत्ता असताना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सातत्याने लक्ष घातले होते. शहरातील अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली होती. युतीचे सरकार असताना चंद्रकांत पाटील पालकमंत्री असले, तरी शहराची सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती होती. त्यामुळे शहराचे नेतृत्व ठरवताना फडणवीस यांचा कौलही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या दृष्टीने ते मोहोळ की पाटील यांपैकी कोणाला संधी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjp is preparing for municipal elections debating whether mp muralidhar mohol or minister patil will lead pune print news apk 13 sud 02