शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. नाकाबंदीत पोलिसांना सहकार्य करण्यास अनेक वाहनचालक फारसे उत्सुक नसतात. नाकाबंदी म्हणजे ‘अडवणूक’ असे अनेकांना वाटते. काही जणांचा अनुभव तसा असेलही. मात्र, नाकाबंदीमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होते, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होते. त्यामुळे नाकाबंदी म्हणजे पाेलिसांचा त्रास, असा सरसकट गैरसमज करून घेणे योग्य ठरणार नाही.

पोलीस दलात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल झाले. पारंपरिक तपास पद्धतीबरोबर तंत्रज्ञानाचा वापर वाढला. खबरे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या पोलिसांनी तपास पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. खरे तर नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन (गुन्हेगार वास्तव्यास असलेल्या ठिकाणांची अचानक तपासणी) या उपाययोजनाही पारंपरिक पोलीस तपास पद्धतीच्या भाग आहेत. प्रत्येक वेळी तांत्रिक तपास उपयुक्त ठरेल आणि सराइत आपसूक जाळ्यात सापडेल, असे होत नाही. त्यामुळे आजही गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्वरित नाकाबंदी करण्याचा आदेश दिला जातो. रस्त्यावर पोलीस दिसल्यास पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सराइतांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो आणि सराइतांचा माग काढणे सोपे होते.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक

पुणे शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण माेठे आहे. १९ मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईचा आदेश दिला. वेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांना आवर घालण्यासाठी नाकाबंदी योग्य ठरते. नाकाबंदीमुळे वाहनचालकाने मद्यप्राशन केले का नाही, याचीही माहिती मिळते. मद्यपी वाहनचालकावर वेळीच कारवाई केल्याने गंभीर अपघात टळू शकतात. मात्र, नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना न जुमानण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पोलिसांच्या अंगावर थेट वाहन घालून पसार होण्याच्या घटना घडतात. तीन दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी परिसरात पहाटे पाचच्या सुमारास नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्यात आली. नाकाबंदी करण्यासाठी लावलेले लोखंडी कठडे पोलिसांच्या अंगावर पडल्याने दोन पोलिसांसह चौघे जण जखमी झाले. या घटनेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीही जखमी झाली. मद्यप्राशन केल्यानंतर पोलीस पकडतील, अशी भीती वाटल्याने वाहनचालकांकडून असे प्रकार घडतात. मात्र, पोलिसांच्या अंगावर वाहन घालणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे, शिवीगाळ- धक्काबुकी करणे असे प्रकार कायद्याने गुन्हा ठरतात. मद्यप्राशन केल्यानंतर कारवाई चुकविण्यासाठी पसार होणाऱ्या वाहनचालकांनी याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

नाकाबंदीत अनेक गैरप्रकार उजेडात येतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैशांचे वाटप केल्याचे आरोप-प्रत्यारोप केले जातात. नाकाबंदीत एखाद्या वाहनात मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्यास त्याची नोंद करून पोलीस प्राप्तिकर विभागाला याबाबतची माहिती देऊन त्यांच्या ताब्यात रोकड दिली जाते. खेड-शिवापूर येथे काही दिवसांपूर्वीच रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी आढळली.

हेही वाचा – थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

वाहनचालकांची तपासणी करून गुन्हे खरेच कमी होतील का, असा प्रश्नही वाहनचालकांंकडून उपस्थित केला जातो. कोथरूडमध्ये दोन वर्षांपूर्वी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दुचाकी चोरताना दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले दोघे चोरटे एका दहशतवादी संघटनेत काम करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. पुणे, मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या शहरांत दहशतवादी बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर तपासयंत्रणाही चक्रावून गेल्या. त्यानंतर तपास यंत्रणांनी देशभरातील दहशतवादी कारवाया उजेडात आणल्या. नाकाबंदी, गस्त प्रभावीपणे घातल्यास त्याचे असे दृश्य परिणामही दिसून येतात. पोलिसिंगचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याने ती राबवावीच, फक्त त्यात सामान्य माणूस भरडला जाणार नाही, याचीही दक्षता घेतलेली चांगली.

rahul.khaladkar@expressindia.com