पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. विविध निकषांवर मूल्यमापन करून ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले. या विश्वविक्रमासाठी ४ हजार १८९ पुस्तकांचा वापर करण्यात आला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने विश्वविक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, ॲड. मंदार जोशी, डॉ. संजय चाकणे, गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वर्लेकर या वेळी उपस्थित होते. विश्वविक्रमी कलाकृतीसाठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला.

हेही वाचा – “अजित पवारांनी उद्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी..”, रुपाली ठोंबरे पाटील यांचं अजब विधान

विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान एक हजार चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृतीचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार साकारलेली कलाकृती पात्र ठरून विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, अशी घोषणा प्रवीण पटेल यांनी केली.

वाचनाने व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. हा महोत्सव केवळ पुण्यात न करता त्याची चळवळ होण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये हा महोत्सव झाला पाहिजे. लोकांना वाचायला आवडते, त्यांना तसे मंच उपलब्ध करून दिले पाहिजेत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. पुणेकरांचे पुस्तकांवर किती प्रेम आहे हे पुणे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येते. यंदा पुस्तक प्रदर्शनासह साहित्य, खाद्य, सांस्कृतिक महोत्सव, बालचित्रपट महोत्सव होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचा प्रारंभ सरस्वती यंत्राचा विश्वविक्रम नोंदवून होत आहे, याचा आनंद असल्याचे पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा – सिंधुदुर्गात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध, काय आहे वेगळेपण?

मुलांच्या मोबाइल वापराबाबत विचार करण्याची गरज

सांस्कृतिकनगरी असलेल्या पुण्यात असलेली विचारांची पोकळी भरून काढण्यासाठी पुस्तक महोत्सव, चर्चा होणे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने लहान मुलांच्या मोबाइल वापरावर बंदी घातली आहे. मुलांची दिशाभूल होणारे साहित्य मोबाइलवर येणार याची काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकार डीपफेकविरोधात कायदा करत आहे. मात्र, मुलांच्या मोबाइल वापराबाबत गांभार्याने विचार करण्याची गरज आहे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

Story img Loader