पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. बोपदेव घाटात नागरिकांना अडवून लूटमार तसेच फिरायला येणाऱ्या तरुणीचा विनयभंग प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी २५ पथके तयार केली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटातील माेबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
हे ही वाचा…बुलेटस्वार-कार चालकातील किरकोळ वाद विकोपाला; बुलेटवरील तरुणाला गमवावा लागला हात!
पाच दिवसांनंतर या प्रकरणात अद्याप महत्त्वाचे धागेदारे पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळे यापूर्वी बोपदेव घाटात लूटमार, तसेच फिरायला येणाऱ्या तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक तपासात महत्त्वाची माहिती मिळाली नसल्याने पोलिसांनी पुणे शहर, ग्रामीण भागातील खबऱ्यांचे जाळे पुन्हा कार्यरत केले आहे. पसार आरोपींची माहिती मिळवण्यासाठी गावातील पोलीस पाटील, तसेच सरपंचांची मदत घेण्यात येणार आहे. पसार आरोपींचा माग काढण्यासाठी ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
हे ही वाचा…अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
आरोपींबाबत माहिती असल्यास पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
© The Indian Express (P) Ltd