पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना अवघड जागी चेंडू लागल्यामुळे एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये मुलाला चेंडू लागल्याचे स्पष्ट दिसते. शौर्य नावाचा मुलगा गोलंदाजी करत होता. पलीकडून फलंदाजाने जोरात फटका मारल्यानंतर चेंडू थेट शौर्यच्या अवघड जागी लागला. त्यानंतर शौर्य जमिनीवर कोसळला.
शौर्य गंभीर असल्याचे कळताच इतर खेळाडू मित्रांनी तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली. एका खेळाडूने त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. शौर्यला जोरात मार लागला असल्यामुळे त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
पुण्यातील येरवडा भागातील लोहगाव येथील स्पोर्टस ॲकॅडमी मैदानात क्रिकेट खेळत असताना हा प्रकार घडला. शौर्य खांदवे हा सहावीला शिकत होता. शाळेला सुट्ट्या असल्यामुळे गुरुवारी (दि. २ मे) तो परिसरातील मुलांसह तो स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. यावेळी हा दुर्दैवी प्रकार घडला. त्यानंतर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शौर्यच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे खांदवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच लोहगाव परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली.