पुणे : जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लाच मागितल्यानंतर व्यावसायिकाने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दिली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला होता. तक्रार अर्जाची पडताळणी करण्यात आल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील, भूकरमापक किरण येटोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची हडपसर परिसरात जमीन आहे. संबंधित जागेची शासकीय शुल्क भरून मोजणी करण्यात आली होती. त्यांनी हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला होता. २०२३ पासून ते पाठपुरावा करत होते. भूमी अभिलेख विभागातील अधिकारी अमरसिंह पाटील आणि किरण येटोळे यांनी जून २०२४ मध्ये संबंधित कामासाठी ५० लाखांची मागणी केली. याप्रकरणी आरोपी येटोळे याने तडजोडीत २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ‘२५ लाख रुपये न दिल्यास काम होणार नाही, तसेच मालमत्तेचे नुकसान होईल’, अशी धमकी दिली होती. त्यानंतर तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली.
याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली. तपासात दोन्ही आरोपींनी तक्रारदाराचे नुकसान होण्याच्या उद्देशाने चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खाडे तपास करत आहेत.