पुण्यात जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरु करण्याअगोदरच्या शेतीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दत्ता भरणे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझा भाऊही त्यांच्यासोबत होता. माझे वडिल आम्हाला लवकर सोडून गेल्यानंतर माझ्यावरु कुटुंबाची जबाबदारी आली. त्यावेळी मी शेती करायला लागलो. मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री आणि डेअरीच्या व्यवसायाने केले. तुमचा विश्वास बसणार नाही. त्या काळामध्ये एक गाय विकली तर त्या किमतीतून एक एकर जमीन विकत घेत होतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. माझ्या बांधाच्या समोर चार एकरांचा एक प्लॉट विकायला निघाला होता. मी चार गायी विकल्या आणि त्या पैशातून मला चार एकर जमीन मिळाली. पण आज ते अशक्य आहे कारण जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय केला तर शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. हे मी स्वतः अनुभवले आहे आणि त्यामुळे मी सांगत आहे,” असे अजित पवार यांनी म्हटले.

निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. पण त्यांनी शेती आणि त्याच्यावर आधारीत असणाऱ्या जोडधंद्यावर लक्ष द्यायला पाहिजे होते. राज्याच्या अर्थसंकल्पात जे गरीब आहेत त्याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.

 शाकाहारी लोकांची पंचायत झाली – अजित पवार

“मला जेव्हा गेल्या वर्षी करोना झाला आणि डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यातून बाहेर पडलो. त्यावेळी डॉक्टर पोष्टीक आहार म्हणून पाया सूप प्यायला सांगत होते. जे सांगत होते मांसाहारीच सांगत होते. त्यामुळे जे शाकाहारी आहेत त्यांची पंचायत झाली. शाकाहारी आणि मांसाहारी हे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. त्यामुळे त्याबद्दलची प्रत्येकाची वेगळी मते असू शकतात,” असेही अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune brighten the old memories of ajit pawar about agriculture abn 97 svk
Show comments