पुणे : डेक्कन जिमखाना भागातील एका बंगल्यातून हिरेजडित दागिने चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने गजाआड केले. चोरट्याकडून २० तोळे दागिने, तसेच आठ हजारांची रोकड असा १७ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चोरट्याने दागिने चोरल्यानंतर महापालिका भवन परिसरातील मेट्रो स्थानकातील जिन्याजवळ एका दगडाखाली लपविल्याचे उघडकीस आले.
अल्लाबक्ष महंमद पीरजादे (वय ३५, रा. रेल्वे भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डेक्कन जिमखाना भागातील एका बंगल्यातील खिडकीचे गज वाकवून कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला जाण्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चित्रीकरणात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पीरजादेने घरफोडी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवार पेठेत सापळा लावला. छत्रपती शिवाजी आखाड्याजवळ पोलिसांचे पथक थांबले होते. त्यावेळी कोंबडी पुलावरुन पीरजादे येत होता. पोलिसांना पाहताच पीरजादे पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. चैाकशीत त्याने डेक्कन भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने त्याने महापालिका भवन मेट्रो स्थानकातील जिन्याजवळ एका दगडाखाली लपविले होते. नदीपात्राजवळ मेट्रो स्थानकाचा जिना आहे. पोलिसांनी लपविलेले दागिने जप्त केले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, महेश बामगुडे, राहुल मखरे यांनी ही कारवाई केली.