पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे.

गाडेच्या मोबाइल क्रमांकाचे पोलिसांनी विश्लेषण केले. गाडेचा पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर, तसेच शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचे आढळले आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. पोलिसांचा गणवेश परिधान केलेेले गाडेचे छायाचित्र उपलब्ध झाले आहे. गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात आहे. गाडेने त्याचा वेश परिधान करून छायाचित्र काढल्याचे उघडकीस आले. गाडेने पोलिसांसारखा गणवेश परिधान करून आणखी काही गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने तपास करण्यात येत असल्यााची मााहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

आरोपी गाडे याच्याविरुद्ध यापूर्वी पुणे ग्रामीण, अहिल्यानगर परिसरात ज्येष्ठ महिलांना लुटण्याचे गुन्हे दाखल झाले होते. जानेवारी महिन्यात स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात त्याने एकाचा मोबाइल चोरला होता. गाडेविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा पोलिसांनी बारकाईने अभ्यास केला. तेव्हा गाडेने महिलांना लक्ष्य केल्याचे उघडकीस आले.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास गाडेने प्रवासी तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. गाडेने तरुणीकडे वाहक असल्याचे बतावणी करून तिला आवारात थांबलेल्या बसमध्ये नेले. गाडेविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गाेळा करण्याचे काम सुरू असून, डीएनए चाचणीसाठी त्याच्या रक्ताचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. गुन्हा करताना गाडेने वापरलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. तपासणीसाठी कपडे न्यायवैद्यक प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Story img Loader