पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. या प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आली आहेत.
या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी १३ ठिकाणी पथक रवाना करण्यात आले आहेत. तसेच आरोपीचा तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे. आरोपीने मागील काही दिवसांत ज्या व्यक्तींना फोन केले आहेत, त्या व्यक्तींकडे चौकशी केली जात आहे.आरोपी दत्तात्रय गाडेला शोधून देणार्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
त्या सर्व घडामोडी दरम्यान दत्तात्रय गाडे या आरोपीच्या मूळ गावी शिरुर तालुक्यातील गुणाट गावात पोलीस पोहोचले आहे. ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या गावात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे आरोपी हा उसामध्ये लपल्याची शक्यता वर्तवली जात असून ऊसामध्ये शोध घेण्यासाठी १०० अतिरिक्त पोलिस कर्मचारी गुणाटला रवाना झाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.