पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका उद्योजकाला पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उद्योजकाला धमकाविण्यासाठी पाकिस्तानातील मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत एका उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोरेगाव पार्क पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ३८ वर्षीय उद्योजक कोरेगाव पार्क भागातील बोट क्लब रस्त्यावर राहायला आहेत. त्यांची खासगी विमान कंपनी (एव्हिएशन ) आहे. या कंपनीकडून हेलिकाॅप्टर, तसेच विमाने भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली जातात.
भारतासह दुबई, इंग्लडमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन अज्ञाताने संपर्क साधला. संबंधित क्रमांक पाकिस्तानातील असल्याचे निदर्शनास आले. या क्रमांकावरुन उद्योजकाला ‘व्हाॅइस नोट’ पाठविण्यात आली होती. ‘तू नवीन हेलिकाॅप्टर खरेदी करत आहेस ना. हेलिकाॅप्टर खरेदी करण्यापूर्वी काही रकम द्यावी लागेल.’ असे त्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर उद्योजकाला पुन्हा एक संदेश पाठविण्यात आला. ‘तुझी संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. पाच कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे संदेशात म्हटले होते.
त्यानंतर २८ फेब्रुवारी आणि १६ मार्च रोजी उद्योजकाला समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करून ‘व्हाॅईस नोट’ पाठविण्यात आल्या. त्यानंतर घाबरलेल्या उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उद्योजकाला धमकाविण्यासाठी ज्या क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे. तो क्रमांक पाकिस्तानातील आहे. खंडणीखोराने ‘प्राॅक्झी सर्व्हर’चा वापर करुन उद्योजकाला धमकाविल्याचा संशय आहे. गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.