पुणे : काँग्रेस आणि भाजप हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक, तर काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपने पुण्यातील उमेदवार जाहीर केले असताना, शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी झगडावे लागल्याने विद्यामान आमदार सुनील कांबळे यांना मागील पाच वर्षांत केलेल्या काही चुकांमुळे निर्माण झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. माजी मंत्री काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे हे अवघ्या पाच हजार मतांनी झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक २० उमेदवार असल्याने या मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे बहुसंख्येने असलेले मुस्लिम मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मतदारसंघात २००९ मध्ये रमेश बागवे निवडून आले होते. त्या वेळी त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार सदानंद शेट्टी यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, २०१४ च्या भाजपच्या लाटेचा त्यांना फटका बसला आणि भाजपचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या निवडणुकीत दिलीप कांबळे यांच्याऐवजी भाजपने त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली. त्या वेळी बागवे आणि कांबळे यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती.

आणखी वाचा-‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका

अवघ्या पाच हजार मतांनी कांबळे विजयी झाले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत सुनील कांबळे हे अनकेदा वादांमुळे चर्चेत राहिले. ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात झाले. त्या ठिकाणी लावलेल्या कोनशिलेवर कांबळे यांचे नाव नसल्याने ते नाराज झाले होते.

कार्यक्रम झाल्यावर ते व्यासपीठावरून खाली येत असताना त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. पुणे महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्यानेही कांबळे वादात सापडले होते. या वादग्रस्त प्रकरणानंतर निर्माण झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याचे कांबळे यांच्यापुढे आव्हान आहे. त्यातच भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात विलंब का लावला, याची चर्चा या मतदारसंघात आहे.

आणखी वाचा-हडपसर येथील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग

हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना हा मतदारसंघवगळता अन्य मतदारसंघांत मताधिक्य मिळाले होते.या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना मोहोळ यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यावरून या मतदारसंघातील मतदारांचा कल स्पष्ट झाला होता. त्यामुळे बागवे यांच्या दृष्टीने यंदाच्या निवडणुकीत ही जमेची बाजू ठरली आहे.

या मतदारसंघात पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक २० उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बागवे आणि कांबळे यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नीलेश आल्हाट हे उमेदवार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांची विभागणी होणार आहे. या मतदारसंघात जातीय समीकरणानुसार दोन लाख ९५ हजार ३८२ मतदारांपैकी सुमारे ५८ हजार मुस्लिम मतदार आहेत. हे मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बागवे यांना मागील पराभव जिव्हारी लागल्याने या वेळी त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. मुस्लिम मतदार हा काँग्रेसला मानणारा असल्याने बागवे यांची या मतदारांवर मदार असणार आहे.

आणखी वाचा-Harshada Wanjale : “…तर त्यांचे पाय तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही”, रमेश वांजळेंच्या पत्नीचा इशारा; लेक मयुरेशच्या प्रचारासाठी मैदानात

कांबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि योजना यावर प्रचारात भर देत आहेत. बागवे यांनी दहा वर्षांपूर्वी आमदार म्हणून आणि त्यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेली कामे मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक, तर काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cantonment assembly constituency challenging for bjp prestige fight for congress pune print news spt 17 mrj