पुणे शहर सांस्कृतिक राजधानी असा किताब मिरवते, ते ठीक. पण, या शहरात ‘सांस्कृतिक’ म्हणून होणारे कार्यक्रम खरेच शहराची सांस्कृतिक जडणघडण करतात का? का ज्यांनी (म्हणजे बहुतेक वेळा संयोजकांनी) या कार्यक्रमांना ‘सांस्कृतिक’ असे म्हटले आहे, त्याला केवळ हजेरी लावण्याने आपले सांस्कृतिक उन्नयन साधले, असे समाधान हजेरी लावणारे करून घेत असतात? अशा कार्यक्रमांना मोठी गर्दी लोटलेली दिसते. पण, त्यातून खरेच रसिक श्रोता-प्रेक्षक घडतो आहे का? या ‘सांस्कृतिक’तेचा समाजाच्या सुसंस्कृततेशी खरेच काही अनुबंध राहिला आहे का?… पुण्यासारख्या शहराने तरी हे आणि असे प्रश्न एकदा विचारून पाहायला हवेत.
तिकीट काढून आलेल्यांचे मनोरंजन करणे, म्हणजे ‘सांस्कृतिक’ काही तरी केल्याचे समाधान पदरी पाडून घेणे, अशी ढोबळच व्याख्या करून घेतलेली असेल, तर असे पुष्कळ कार्यक्रम पुण्यात जवळपास वर्षभर होत असतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा तर त्यासाठी अगदी सुकाळ. दिवाळी पहाट ते मराठी भाषा गौरव दिनापर्यंतच्या या सुकाळात आपला ‘उत्कर्षकाळ’ साधायला अनेक संयोजक आणि कलाकारही आतुर असतात. अमुक महोत्सव, तमुक फेस्ट या शीर्षकांखाली होणारे हे कार्यक्रम म्हणजेच शहराची सांस्कृतिक खूण अशी ठाम धारणा अनेकांची झालेली दिसते.
हे ही वाचा… किसन महाराज साखरे यांचे निधन
अलीकडे कोणताही कार्यक्रम करायचा, तर त्याला तामझाम करावाच लागतो, असा एक अलिखित संकेत आहे. कार्यक्रमस्थळ, मंचाची रचना, प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, प्रवेशिकांचे चकचकीत मुद्रण, जाहिराती, समाज माध्यमांवर प्रचार असे अनेकांगी तपशील त्यासाठी भरावे लागतात. ‘मोठ्या’ नावांच्या जोडीने हे सगळं ‘भारी’ असेल, तर श्रोते-प्रेक्षकांना आकर्षित करणे सोपे, असे यामागचे ‘गणित’ असते. संयोजकांच्या दृष्टीने योग्यच. कारण, त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा असतो. शिवाय, या सगळ्या पूरक गोष्टींमुळे उपलब्ध होणारे रोजगार आणि पर्यायाने एक समांतर अर्थव्यवस्था, यामुळे हा सगळा मामला व्यावहारिक आहेच. हे सगळे उत्तम, असे आपण मानू आणि त्याचे कौतुकही करू. तरीही, मुदलात एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे, ‘या शहरात ‘सांस्कृतिक’ म्हणून होणारे हे कार्यक्रम खरेच शहराची सांस्कृतिक जडणघडण करतात का?’
आता पैसे देऊन काढलेल्या तिकिटात ठोक मनोरंजन होत असेल, तर या प्रश्नाचे ‘मोल’ काय, असाही प्रश्न कुणी विचारू शकेल. पण, मग त्यावर प्रतिप्रश्न एवढाच, की मनोरंजनासाठी मोबाइलपासून चित्रपटगृहांतील मोठ्या पडद्यांपर्यंत अनेक पडदे अहोरात्र उपलब्ध असताना, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून परत मनोरंजनच पदरात पाडून घेण्यात हशील काय? यावर अनेकांकडे उत्तर असले, तरी ते देण्यात थोडी अडचण आहे. कारण, त्यावरचे खरे उत्तर असे आहे, की पुण्यासारख्या शहरात अशा महोत्सवांना हजेरी लावणे, हे थेट त्या शहरात आपले सामाजिक स्थान उंचावणे आहे. एकदा हा हेतू पक्का असेल, तर सांस्कृतिक जडणघडण काय होते, याबद्दल एक तर प्रश्नच पडत नाहीत किंवा अत्यंत परिघावरची उत्तरे दिली जातात. उदाहरणार्थ, स्वत:ची प्रतिष्ठा वाढवायला का असेना, एखादा आला रागसंगीत ऐकायला आणि पडले त्याच्या कानावर चार चांगले सूर, तर काय हरकत आहे? उलट अशांसारख्यांमुळे सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते वगैरे. पण मग, म्हणजे एखाद्या अत्यंत श्रीमंत व्यक्तीकडे केवळ पैसे आहेत म्हणून त्याने काही जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे भिंतींवर टांगली, पुस्तकांच्या खणांत अभिजात पुस्तकांची आरास मांडली, श्रेष्ठ गायक-संगीतकारांच्या रचनांचे हार्ड ड्राइव्ह त्याच्या प्रगत तंत्रयुक्त प्रक्षेपण यंत्रणेसह स्वतंत्र ‘म्युझिक रूम’मध्ये आणले, म्हणून त्याला ‘जाणता रसिक’ हा किताब देऊन गौरवायचे का, हा त्यावर पुन्हा प्रतिप्रश्न. खर्च केल्यावर वस्तू मिळतात हे ठीक, पण त्यातून सांस्कृतिक उन्नयन साधतेच असे नाही, किंबहुना क्वचितही साधत नाहीच. दणक्यात साजऱ्या होणाऱ्या वलयांकित इव्हेंट्सबाबत म्हणूनच पुण्यासारख्या शहराने तरी काही प्रश्न विचारायला हवेत. गोष्टी मोफत दिल्याने त्याची किंमत राहत नाही आणि सादर करणाऱ्यांमध्ये व्यावसायिकताही राहत नाही, हे मान्यच. पण, मग विशिष्ट ‘किमती’ची क्रयशक्ती हा एकमेव निकष ठरवून, अशांसाठीच कार्यक्रम केल्याने नफ्याशिवाय नेमके कोणते गणित साधते? बरे, एवढे ‘सांस्कृतिक दातृत्व’ दाखवूनही रस्तोरस्ती होणाऱ्या वाहतूक नियमभंगांपासून नात्यांतल्या प्रतारणांपर्यंतच्या अनेक घटना या शहरात सर्रास, दिवसागणिक आणि सर्व आर्थिक वर्गांत घडतात, तेव्हा यातून आपण नेमकी कोणती सुसंस्कृतता जपतो आहोत? खरा प्रश्न असा आहे, की अनेक चळवळींचे उगमस्थान असलेल्या या शहरात चांगल्या वाचण्याची, ऐकण्याची, पाहण्याची, मने समृद्ध करण्याची एकही सांस्कृतिक चळवळ आत्ताच्या काळात का उभी राहू शकत नाही? का आपल्याला ‘सांस्कृतिक’ म्हणजे काय, या प्रश्नालाच बगल द्यायची आहे?
siddharth.kelkar@expressindia.com