पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात न्यायालयाने अगरवाल दाम्पत्यासह अश्फाक मकानदारच्या पोलीस कोठडीत चार दिवस वाढ करण्याचे आदेश सोमवारी दिले.अटक करण्यात आलेला आरोपी मकानदारने मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांना कोणाच्या सांगण्यावरून मदत केली आहे, याचा शोध घ्यायचा असल्याने विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी आणि अश्फाक यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकार पक्षाने न्यायालयात केली.

हेही वाचा >>> Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपींच्या जामिनास विरोध… सरकार पक्षाचे म्हणणे काय?

अगरवाल दाम्पत्यासह अश्फाकच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. तिघांना न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे याच्यामार्फत अश्फाकने डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना पैसे पोहोचविले. अश्फाकने कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचविले, या दृष्टीने तपास करायचा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयात दिली. अश्फाक गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. त्याला कोणी मदत केली, तसेच आरोपी डाॅ. अजय तावरेच्या संपर्कात तो कसा आला, या दृष्टीने सखोल तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती गोवेकर यांनी न्यायालयाकडे केली.

हेही वाचा >>> Pune Accident Case : विशाल अगरवालचा पाय खोलात! आणखी एक गुन्हा दाखल

या गुन्ह्याच्या तपासात प्रगती झाली आहे. आरोपी घटकांबळेने वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाच्या आवरात घटकांबळेने अगरवाल यांच्याकडून रोकड घेतली होती. डाॅ. श्रीहरी हाळनोर याच्या हस्ताक्षराचा नमुना जप्त करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या वाॅर्ड क्रमांक ४० मधील नोंदणी पुस्तिका (रजिस्टर) जप्त करण्यात आली आहे. साक्षीदारांकडे केलेल्या चाैकशीत विशाल अगरवाल, अश्फाक मकानदार, डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील अनिल कुंभार यांनी युक्तिवादात केली. अगरवाल दाम्पत्याच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील आणि आरोपी अश्फाकच्या वतीने ॲड. आर. एल. धापटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.