रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याकरता समिती स्थापना करण्यात आली आहे. तसंच, आणखी समिती बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नरनावरे यांनी दिली. द हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून नियमांचे पालन केले गेले होते का याची चौकशी ही समिती करणार आहे.
बाल न्याय विभागाने (Juvenile Justice Board-JJB) अल्पवयीन मुलाला जामीन दिल्यानंतर तत्काळ राज्याच्या महिला व बालविकास विभागाने गेल्या आठवड्यात पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. विभागातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला. एका वेगवान पोर्श कारने दुचाकीवरील दोघांना उडवलं. ही पोर्श कार एक अल्पवयीन चालक चालवत होता. तसंच, तो मद्यधुंद अवस्थेतही होता. तो अल्पवयीन असल्याने हे प्रकरण बाल न्याय मंडळात दाखल झाले. या प्ररकणी सुनावणी करताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी त्याला काही मोघम अटींवर जामीन मंजूर केला. यामध्ये ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतुकीचे नियम पाळणे, अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करणे आदी अटी लावण्यात आल्या होत्या. दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मद्यधुंद चालकाला या शुल्लक अटींवरून जामीन मिळाल्याने राज्यभर संतापची लाट उसळली होती.
राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नरनावरे म्हणाले की, बाल न्याय मंडळात न्यायव्यवस्थेतील एक सदस्य आणि राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोन व्यक्तींचा समावेश आहे. आम्ही राज्य सरकारने नियुक्त केलेल्या जेजेबी सदस्यांच्या एकूण वर्तनाची चौकशी करण्यासाठी, कार अपघात प्रकरणात आदेश जारी करताना नियमांचे पालन केले गेले की नाही हे तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.”
“मला बाल न्याय कायद्यांतर्गत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांच्या एकूण वर्तनाची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्याच्या आदेशाच्या संदर्भात सदस्यांची चौकशी करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे”, असं नरनावरे म्हणाले.
हेही वाचा >> ससूनच्या चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव अन् रुग्णालयातील परिचारिकांपासून कर्मचारी उपाशी…
ससूनच्या कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी
ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्याची अदलाबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने मंगळवारी ससूनमधील अधिष्ठात्यांपासून आपत्कालीन कक्षातील परिचारिकांसह कर्मचाऱ्यांची चौकशी केली.
समितीच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळीच ससूनला भेट दिली. समितीने सुरुवातीला आपत्कालीन विभागाची पाहणी केली. त्यानंतर रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल झाली त्या वेळी नेमके काय घडले, याबाबत चौकशी सुरू केली. ही चौकशी दिवसभर अधिष्ठाता कार्यालयात सुरू होती. त्यात घटना घडली त्या दिवशी आपत्कालीन विभागात कार्यरत असलेल्या परिचारिका, कर्मचारी, डॉक्टर, तंत्रज्ञ यांची चौकशी करण्यात आली. तसेच, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांच्यासह अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचीही चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.