पुणे : ‘चॅम्पियन्स ट्राॅफी’त अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर शहरभर जल्लोष करण्यात आला. जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील गोखले स्मारक चौकात तरुणाईने जल्लोष करून विजय साजरा केला.
‘चॅम्पियन्स ट्राॅफी’स्पर्धेत भारताने १२ वर्षांनी विजय मिळवला. त्यानंतर शहर, तसेच उपनगरात जल्लोष करण्यात आला. चाैकाचौकांत आतषबाजी करण्यात आली. अंतिम सामन्याचे प्रक्षेपण पडद्यावर करण्यात आले होते. सामना सुरू असतानाच शहरात शांतता होती. विजय मिळविल्यानंतर तरुणांनी जल्लोष केला. ढोल-ताशा, तसेच ध्वनीवर्धकावरील गीतांवर नृत्य केले. स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर तरुणांनी दुचाकी फेरी काढली. जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागात गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने तरुण गोखले स्मारक चौकात जमल्याने वाहतूक विस्कळीत झाली. विजयानंतर डेक्कन जिमखाना परिसरातील बंदोबस्ता ठेवण्यात आला होता.