पुणे : अनेक सरकारी विभागांकडून इमारतीच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प सुरू करून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यातून विजेच्या खर्चात बचत होत आहे. आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घोरपडीतील डिझेल लोको शेडमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून वर्षाला रेल्वेची वीज देयकात ५२ लाख रुपयांची बचत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोरपडीतील डिझेल लोको शेडमध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. डिझेल लोको शेडच्या छतावर एकूण १ हजार १८८ सौर पॅनेल ६ हजार ५०० चौरस मीटर परिसरात बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पातून वर्षाला अंदाजे ९.४४ लाख किलोवॉट वीजनिर्मिती होणार आहे. डिझेल लोको शेडचा वार्षिक वीज वापर ९.४६ लाख किलोवॉट आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या वीज देयकात ५२ लाख रुपयांची बचत होईल. याचबरोबर सौरऊर्जा प्रकल्पामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन प्रतिवर्ष १८ हजार १२२ टनांनी कमी होण्यास मदत होईल. हा पर्यावरणपूरक प्रकल्प ३९ हजार ८०५ वृक्षांचे रोपण करण्यासमान आहे.

हेही वाचा…पिंपरी- चिंचवड: तुतारीचं काम करणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचं बैठकीत परखड मत..म्हणाले, लोकसभेत…!

पुणे-लोणावळा मार्गाची पाहणी

सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी पुणे-लोणावळा मार्गाची पाहणी केली. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यादव यांनी लोहमार्ग, विद्युत ओव्हरहेड उपकरणे, पुलांची स्थिती, सिग्नल यंत्रणा यासह इतर तांत्रिक बाबींचे निरीक्षण केले. याचबरोबर त्यांनी पुण्यातील रनिंग रूमचीही पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रवाशांच्या सुरक्षेकडे व प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune central railway s new rooftop solar plant on diesel loco shed ghorpadi to save rs 52 lakh annually pune print news stj 05 psg