पिंपरी : सांगवीतील पीडब्ल्यू मैदानावर १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान श्री शिव पुराण कथा आणि अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती समन्वय समिती व पिंपरी-चिंचवड ढोल ताशा महासंघाच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प स्मारक येथे शनिवारी ढोल-ताशा वादनाचे आयोजन केल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी प्रसूत केले आहेत.
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यू मैदानावर श्री शिव पुराण कथेचे आयोजन केले आहे. त्यासाठी अति महत्वाचे लोक (व्हीव्हीआयपी), लाखो भाविक खासगी वाहनाने येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुनी सांगवीतील पाण्याची टाकी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक) ते साई चौकादरम्यान येण्या-जाण्याच्या मार्गावर वाहनांना बंदी असणार आहे. या मार्गावरील वाहनचालकांना पाण्याच्या टाकीकडून बँक ऑफ महाराष्ट्र चौक, माकन चौक, सांगवी फाटा, महेश्वरी, फेमस चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल. साई चौक ते पाण्याची टाकी, माकन, माहेश्वरी चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजू विना वाहनतळ (नो-पार्कींग) असणार आहेत. हा बदल १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे.
हेही वाचा : पुणे महापालिकेला दणका : पुणेकरांचे ३५४ कोटी रुपये जाणार ‘पाण्यात’
निगडीतील वाहतुकीत शनिवारी दुपारपासून बदल
देहूरोडकडून येणारी वाहतूक भक्ती-शक्ती चौकात न येता उड्डाणपुलावरून ग्रेड सेपरेटरमधून जाऊन रुद्रा पार्किंगच्या समोरील आउटमधून बाहेर पडून इच्छित स्थळी जाईल. त्रिवेणीनगर चौकाकडून येणारी वाहतूक भक्ती-शक्ती पुलावरून न जाता डाव्या बाजूने टिळक चौक तसेच भक्ती-शक्ती भुयारी पुलाखालून अप्पूघर मार्गे जाईल.अप्पूघर, रावेतकडून येणारी वाहतूक व वाहतूकनगरी मधून येणारी वाहतूक भक्ती-शक्ती पुलावर न चढता ती भक्ती-शक्ती भुयारी पुलाच्या खालून अंकुश चौक मार्गे जाईल.
हेही वाचा : एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर उलटतपासणीत दिली ‘ही’ माहिती
संभाजी चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक ही भक्ती-शक्ती पुलावर न चढता भेळ चौक येथे लोकमान्य हॉस्पिटल मार्गे टिळक चौकातून जाईल. काचघर चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक भक्ती-शक्ती पुलावर न चढता काचघर चौकातून उजव्या बाजूने गांधी हॉस्पिटल मार्गे टिळक चौक येथून जाईल. टिळक चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक भक्ती-शक्ती चौकाकडे न येता एसबीआय समोरील इन मधून ग्रेडसेपरेटर मार्गे भक्ती-शक्ती पुलावरून देहूरोड मार्गे जाईल. हा बदल शनिवारी दुपारी दोन ते कार्यक्रम होईपर्यंत असणार आहे.