छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पिढीतील तब्बल ५ हजार दुर्मिळ नाणी जमा करणारा एक अवलिया पिंपरी-चिंचवड शहरात आहे. ते गेल्या २५ वर्षांपासून महाराजांच्या पिढीतील दुर्मिळ नाणी जमा करण्याचा छंद जोपासत आहेत. किरण करांडे असे या अवलीयाचे नाव असून महत्वपूर्ण असा त्यांचा संग्रह असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आज त्यांच्याकडे तब्बल ५ हजार नाणी पाहायला मिळतात. त्यांच्याकडे शिवराई आणि होण या दोन पद्धतीची नाणी आहेत. होण अतिदुर्मिळ असून त्याची प्रतिकृती त्यांच्याकडे आहे.
किरण करांडे हे एका नामांकित कंपनीत काम करत असून वयाच्या विसाव्या वर्षांपासून त्यांनी नाणी जमवण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या या छंदामुळे आज त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पिढीतील तब्बल पाच हजार नाणी जमा झालेली आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतः चलनात आणलेली नाणी पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक झाला तेव्हा दोन प्रकराची नाणी तयार करण्यात आली होती. त्यापैकी एक नाण सोन्यात तर दुसरं तांब्यात तयार करण्यात आलं होतं. तांब्याच्या नाण्याला आपण शिवराई म्हणतो, तर सोन्याच्या नाण्याला होण असे संबोधलं जातं.
तांब्याच्या नाण्यावर देवनागरी लिपीमध्ये पुढील बाजूस श्री राजा शिव तर मागील बाजूला छत्रपती असा मजकूर आहे असं किरण करांडे यांनी सांगितलं. आताच्या पीढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिढीतील नाणी पहायला मिळावी हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी अनेक अडचणींवर किरण यांनी मात केली आहे. अनेकदा घरातील व्यक्तींना या छंदामुळे त्रास व्हायचा. मात्र, त्यानंतर हळूहळू प्रतिष्ठित व्यक्ती घरी येऊ लागल्याने कुटुंबातील व्यक्तींचा विश्वास बसला आणि त्यांनी पाठिंबा दर्शविला, असंही ते सांगतात. याच बळावर १६७४ ते पेशवाईच्या काळापर्यंतची नाणीदेखील त्यांच्याकडे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पिढीतील नाण्यांचे वजन हे १० ग्रॅम पासून साडेतेरा ग्रॅम पर्यंत आहे. शिवाय, पेशव्यांच्या पिढीतील दुदांडी शिवराय नाणीदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. या नाण्यावर वेगळ्या प्रकारची चिन्ह आहेत. केवळ पुस्तकांमध्ये पाहायला मिळणारी नाणी अशा छंद जोपासणाऱ्या अवलियांमुळे पाहायला मिळतात. अशा छंदवेड्या अवलियांमुळे आपला इतिहास समजणं सोपं होतं.