पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या पिंपरी तसेच कसबापेठ या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने या जागांवरील निवडणुकांच्या तारखांत बदल केलेला आहे. असे असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे जागावाटपावर चर्चे केली जात आहे. त्यासाठीच आज (२५ जानेवारी) ठाकरे गटाने शिवसेना भवानात महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर आम्ही चिंचवड या जागेसाठी आग्रही आहोत, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले. ते आज (२५ जानेवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >> Breaking: निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या; परिपत्रकात दिलं ‘हे’ कारण!
चिंचवडची जागा शिवसेनेकडे असावी
“दोन जागांवर पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. या दोन्ही जागांवर आमदारांचे दुखद निधन झालेले आहे, त्यामुळे या निवडणुका घेतल्या जात आहेत. चिंचवडची पोटनिवडणूक आम्हीच लढावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. चिंचवड येथील मतदारांचाही तोच हट्ट आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे हे मातोश्रीवर आले होते. त्यावेळी या निवडणुकीविषयी चर्चा झाली. तेव्हादेखील कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने कसे लढावे हे आपण ठरवू. मात्र चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी, असे मत आम्ही मांडले,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
चर्चेतून प्रश्न सुटतो
“राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी चांगली झुंज दिली होती. यावेळी ही जागा आम्ही जिंकू. महाविकास आघाडी आहे. चर्चेतून प्रश्न सुटतो. आम्हीदेखील अनेक जागांवर दावा करतो. चिंचवडची जागा राष्ट्रवादीने लढवावी असे मत राष्ट्रवादीचे आहे. अजित पवार यांनी याबाबत मत मांडले होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असावी, असे आमचे मत आहे,” असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.