पुणे : शहरात सध्या ऑक्टोबर हीटमुळे उकाडा वाढला आहे. त्यातच ढगाळ वातावरण असून, पाऊसही पडत आहे. या खराब हवामानामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विषाणूजन्य संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील हवामान हे सध्या खराब असून, ते विषाणू संसर्गास पोषक ठरत आहे. यामुळे फ्ल्यूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दी, ताप, थंडी आणि खोकला ही लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. याचबरोबर घसा दुखणे आणि अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येत आहेत. तसेच, श्वसनविकाराच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. श्वसनमार्गाला संसर्ग आणि खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: दम्याच्या रुग्णांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.

आणखी वाचा-शहरात आता रोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असून, याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले की, लहान मुलांमध्ये फ्ल्यूचा संसर्ग जास्त दिसून येत आहे. सर्दी, ताप, खोकल्यासोबत अतिसाराची लक्षणे दिसून येत आहेत. मुले आजारी पडल्यास पालकांनी त्यांना शाळेत पाठविणे टाळावे. कारण शाळेत गेल्यानंतर ती इतर मुलांच्या संपर्कात येऊन आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका असतो. सध्या रुग्णसंख्येत सुमारे ३० टक्के वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे पालकांनी मुलांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवावे. मुलांमध्ये लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

ससून सर्वोपचार रुग्णालयातील औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले की, सध्याचे हवामान विषाणू संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा संसर्ग कमी होऊ लागला असून, इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. श्वसनविकाराचे रुग्णही वाढले असून, थंडी वाढल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने ताप, सर्दी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसत असली तरी काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लक्षणे दिसून येताच तातडीने उपचार सुरू करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-पुणे: मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी

खराब हवामानामुळे त्रास

  • सर्दी
  • खोकला
  • ताप
  • अंगदुखी
  • अतिसार
  • श्वसनास त्रास

काळजी काय घ्यावी?

  • लहान मुलांना दरवर्षी फ्ल्यू प्रतिबंधक लस द्यावी.
  • सर्वांनी आजारी पडल्यानंतर मास्कचा वापर करावा.
  • मूल आजारी पडल्यास त्याला शाळेत पाठवू नका.
  • आजारी व्यक्तीला भरपूर पाणी पिण्यास द्या.
  • बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा.
  • लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांकडून उपचार घ्या.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune citizens are in trouble due to bad weather care advice from healthcare professionals pune print news stj 05 mrj